हरित श्वासांचा सोहळा........

हरित  श्वासांचा सोहळा......
“आकाशातला सूर्य जर झाकला, तर पृथ्वी अंधारते; निसर्गाचा श्वास जर अडखळला, तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येते.”

आधुनिक जीवनशैली, औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानाचा अमर्याद वापर यामुळे मानवाने प्रगती साधली; पण या प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविवेकी वापर, जंगलतोड, प्रदूषण, हवामानबदल, जागतिक तापमानवाढ यामुळे निसर्गाचा श्वास अडकतोय. मानवाचे अस्तित्वच पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आज अत्यावश्यक झाले आहे.
पर्यावरण म्हणजे आपल्याभोवती असलेले सर्व घटक — हवा, पाणी, माती, वृक्ष, प्राणी, मानव, समाज, संस्कृती. ही एक परस्परसंबंधित साखळी आहे. एखाद्या घटकातले बिघाड संपूर्ण साखळीला डळमळीत करते. उदाहरणार्थ, पावसाच्या पद्धतीत बदल झाला तर शेतीवर परिणाम होतो, अन्नसाखळी विस्कळीत होते आणि शेवटी मानवावर परिणाम होतो.
पर्यावरण म्हणजे नुसती हवा-पाणी-माती एवढेच नव्हे, तर आपल्या जीवनाचा अदृश्य श्वास आहे. झाडाच्या पानावरून झरणारा दवबिंदू, आभाळावर तरंगणारे ढग, पावसात भिजणारी माती, नदीच्या ओठांवरून गाणे गाणारा लहानसा ओहोळ, आणि अगदी मनुष्याच्या डोळ्यातला अश्रू—हे सगळे पर्यावरणाचे घटक आहेत.
निसर्ग ही एक अखंड वीणा आहे, आणि प्रत्येक घटक तिचा एक सूर आहे. एकही सूर बिघडला, तरी संपूर्ण गाणे विस्कटते.
बालपणीच्या आठवणींमध्ये डोकावलं की डोळ्यांसमोर हिरव्या गच्च झाडांची छाया, अंगणातल्या चिंचेची सळसळ, आकाशात ढगांचा गडगडाट आणि उन्हाळ्यात गार वाऱ्याची झुळूक उभी राहते. त्या वेळेस आपण निसर्गात राहत होतो की निसर्गच आपल्यात राहायचा हे सांगता यायचं नाही.
पण आता? शहरांच्या काचेच्या इमारतींनी आभाळ झाकून टाकलंय, नद्या तुडुंब भरूनही तहान भागवत नाहीत, श्वास घेताना फुप्फुसे भारावून न जाता थकून जातात. या सगळ्यामागे एक न बोललेला प्रश्न उभा आहे – आपलं पर्यावरण कुठे हरवलं?
कधी वाटते आपण निसर्गाशी संवाद साधला तर, तर काय होईल.........
आपण जर एखाद्या पाखरासारखं पंख पसरून आकाशात उडालो, तर काय दिसेल? डोंगराच्या कड्यावरून ओसंडून वाहणारा धबधबा, पायवाटेला सजलेली वनफुले, शेतात गाणारे शेतकरी, शिवारात खेळणारी मुलं… हेच तर खरं पर्यावरण!
निसर्ग म्हणजे केवळ झाडे-पाणी नाही, तर माणसाचा जिव्हाळा आहे. आईच्या उबदार कुशीत झोपल्यासारखी सुरक्षितता आपण निसर्गाच्या मांडीवर अनुभवतो.
पूर्वीची हरवलेली हिरवाई आता फारशी दिसत नाही.
पूर्वीच्या गावात अंगणात तुळशीचा वास असायचा, दाराशी आंब्याची फांदी, कौलांवरून सरकणारे पावसाचे थेंब, झोपाळ्यावर झुलणारी बालपणं…
 आज मात्र या चित्राऐवजी दिसतात काँक्रिटच्या भिंती, रसायनांचा वास आणि सांडपाण्याच्या गटारांचा गोंगाट.
एकेकाळी अंगणातील वड-पिंपळाचा वृक्ष गावाचा आधार होता. त्याखाली सभा व्हायची, कीर्तन व्हायचं, पाखरांची घरटी असायची. आता त्या जागी पसरलेले आहेत मॉल्स आणि पार्किंग.
आज माणूस स्वतःच्या प्रगतीचा इतका कैदी झालाय की त्याच्या श्वासातच कैद झालेलं धूरकण आहे.
शहरातल्या रस्त्यावर उभं राहून पाहिलं तर मोटारींच्या धुरात आपलं हृदय धडधडू लागतं.
नदीकाठी गेलं की गंध न येता दुर्गंध येतो.
शेतात पाऊल टाकलं की जमिनीची मातीही करपल्यासारखी वाटते.
हा निसर्गाचा आक्रोश आहे. आणि तो आक्रोश ऐकायचं धाडस आता कमी झालं आहे.
माणूस आणि निसर्गाचं नातं फार फार पूर्वी पासूनच आहे.
माणूस निसर्गावर प्रेम करतो, पण त्याच्यावर मालकी गाजवतो. ही मालकीच संकटाचं मूळ आहे. झाड कापताना त्याची सळसळ आपण ऐकतो का? नदीचा प्रवाह रोखताना तिच्या वेदना समजतो का? हवेत विषारी धूर सोडताना आकाशाची धडधड आपण जाणतो का?
निसर्गाशी नातं हे आई-मुलाच्या नात्यासारखं आहे. आईला लुटून जगणारा मुलगा शेवटी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतो.
आपली संस्कृती ही पर्यावरणपूरक संस्कृती आहे.
भारतीय संस्कृतीने निसर्गाला देव मानलं. तुळशीवृंदावनाचा आराध्य सण, वड-पीपळाच्या पूजा, गोवत्स द्वादशी, नागपंचमी, पावसाळ्यातील हरितालिका—हे सारे सण निसर्गाशी आपलं जोड घट्ट करण्यासाठीच तर होते. आज विज्ञानानेही मान्य केलं आहे की या परंपरांच्या मागे वैज्ञानिक कारणं होती.
पर्यावरणाचे संजीवांच्या जीवनात अनन्यसाधारन महत्व आहे.
 जसे,अन्न आणि पाणी – शेती, पिके, धान्य, भाज्या, फळे या सर्व गोष्टी पर्यावरणावर आधारलेले आहेत.
 हवा आणि श्वास – झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून प्राणवायू देतात.
 औषधे आणि आरोग्य – अनेक औषधी वनस्पती निसर्गातच उपलब्ध आहेत.
आश्रय – वृक्ष, नद्या, डोंगर, समुद्र मानवाला निवारा देतात.
संस्कृती आणि जीवनमूल्ये – आपली सणवार, परंपरा, कला यांचा उगमही निसर्गाशी जोडलेला आहे.
सध्याची काही संकटे आहेत जी आपल्या पर्यावरणावर परिणाम करतात.
१. प्रदूषण
हवा प्रदूषण : कारखाने, वाहने, प्लास्टिक जाळणे यामुळे वातावरणात हानिकारक वायू वाढत आहेत.
पाणी प्रदूषण : औद्योगिक सांडपाणी, रसायने, प्लास्टिक, नदी-तलावात विसर्जन यामुळे जलस्रोत नष्ट होत आहेत.
माती प्रदूषण : रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेक जमिनीला निष्प्रभ करत आहे.
ध्वनी प्रदूषण : सणासुदीला होणारा फटाक्यांचा मारा, वाहनांचा गोंगाट, कारखान्यांचा आवाज यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
२. जंगलतोड
जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत. मात्र शहरीकरण, औद्योगिकीकरण, रस्ते-विकास यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. यामुळे प्राणी अधिवास नष्ट होतो, पावसाचे प्रमाण घटते.
३. हवामानबदल
जागतिक तापमान वाढल्याने पर्जन्यमान बदलते. चक्रीवादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेची लाट ही त्याची उदाहरणे आहेत.
४. जैवविविधतेचा ऱ्हास
प्राण्यांच्या जाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्राणी आणि वनस्पती नष्ट झाले तर संपूर्ण पर्यावरणीय संतुलन ढासळेल.
५. प्लास्टिकचा शाप
प्लास्टिक हा आजचा सर्वात मोठा शत्रू ठरला आहे. तो विघटनशील नाही, त्यामुळे नद्या-समुद्र प्रदूषित होतात, प्राणी मरतात.
आता या संकटांची काही कारणे देखील आहेत.
बेफाम औद्योगिकीकरण व शहरीकरण,लोकसंख्यावाढ,
निसर्गाकडे उपभोगवादी दृष्टी,जंगलतोड व अतिक्रमण,
तंत्रज्ञानाचा गैरवापर,पर्यावरणाबाबत जागरूकतेचा अभाव.
आपण जर खऱ्या अर्थाने पर्यावरण वाचवू इच्छित असू, तर त्यासाठी फार मोठे उद्योग नाही, तर छोट्या छोट्या सवयी बदलण्याची गरज आहे.
घराघरांतून प्लास्टिक बंद केलं तर पृथ्वीला नवा श्वास मिळेल.
कचरा वर्गीकरण केलं तर नद्या-तलाव पुन्हा स्वच्छ होतील.
अंगणात एक झाड लावलं तरी एक कुटुंब शुद्ध हवा श्वासात घेईल.
वाहनांपेक्षा चालण्याला, सायकलला प्राधान्य दिलं तर शहरांच्या आभाळावरचे धुरकट ढग विरतील.
आपण वैयक्तिक पातळीवर सुद्धा प्रयत्न करू शकता.
पाणी, वीज यांचा काटकसरीने वापर.
प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरणे.
 शक्य तितकी झाडे लावणे व त्यांची निगा राखणे.
कचऱ्याचे वर्गीकरण – ओला आणि सुका कचरा वेगळा करणे. खते म्हणून कंपोस्टचा वापर. सार्वजनिक वाहतूक प्राधान्याने वापरणे.
सामाजिक पातळीवर- 
ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांनी वृक्षारोपण मोहीमा राबवाव्यात.
पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग करावा.
स्वच्छता अभियान सतत सुरू ठेवावे.
शासनाच्या पातळीवर- 
प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर कायदे करणे.
नवीकरणीय ऊर्जा (सौर, पवन, जलविद्युत) यांना प्रोत्साहन.प्लास्टिकबंदी प्रभावीपणे अंमलात आणणे.
पर्यावरणपूरक उद्योगधंदे प्रोत्साहित करणे.
लोकसहभागाचे महत्व- 
पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. “थेंबे थेंबे तळे साचे” या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने केलेली छोटीशी कृती मोठा बदल घडवू शकते.
एका दिव्याची वात पेटवून अंधार घालवता येतो, तसाच प्रत्येक व्यक्तीचा छोटा प्रयत्न मोठा बदल घडवू शकतो. पाणी वाचवणे, वीज कमी खर्चणे, झाड लावणे, प्लास्टिक टाळणे—ही छोटी पण महत्त्वाची पावले.
दिवाळीच्या कंदिलासारखं भविष्य उजळून निघावं, यासाठी आज आपण पर्यावरणाचा दिवा पेटवला पाहिजे. अन्यथा मुलांच्या हातात आपण फक्त धुरकट आकाश, सुकलेले ओढे आणि श्वास गुदमरलेली पृथ्वी देऊ.
आपण इच्छितो का की पुढच्या पिढीला तारे दिसावेत? त्यांना पक्ष्यांच्या गाण्याने जाग यावी? नदीकाठी बसून त्यांनी कवितेच्या ओळी लिहाव्यात? जर होय, तर पर्यावरण संवर्धन हा आपला आजचाच संकल्प असायला हवा.
पर्यावरण हा कागदावरील विषय नाही, तर जीवंत श्वासांचा सोहळा आहे. त्याची काळजी घेणं म्हणजे स्वतःचं भविष्य जपणं.

पुढील पिढ्यांच्या हातात आपण कशी पृथ्वी द्यायची? राखेचा डोंगर की हिरवाईचा साज? प्लास्टिकच्या समुद्रात बुडणारा किनारा की फुलपाखरांच्या थव्यांनी भरलेली बाग?
उत्तर आपल्याच हातात आहे. विज्ञानाची साथ आणि निसर्गाचा सन्मान यातूनच भविष्याचा दीप प्रज्वलित होऊ शकतो.
पर्यावरण ही केवळ चर्चेची गोष्ट नाही, तर आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे. निसर्गाशी केलेला अन्याय शेवटी माणसालाच भोगावा लागतो. म्हणून आज एकच घोष करायला हवा—
“निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा, भविष्य वाचवा.”
आज आपल्याला निसर्गाने हात जोडून विनंती केली आहे – “माझं रक्षण करा, मी तुमचं अस्तित्व जपेन.”
मग चला, या दिवाळीत दिव्याबरोबर एक नवा संकल्प पेटवूया—
 “हरित पर्यावरण, सुखी जीवन.” 

@उज्वला किसन तायडे, अकोट
मोबाईल - 9881194429


#हरित श्वास 
#पर्यावरण 
संदर्भ - काही माहिती इंटरनेट, पर्यावरण विषयक पुस्तका मधून,

Comments

  1. अतिशय हृदयस्पर्शी पर्यावरणाची व्यथा आपण मांडलेली आहे. पर्यावरण वाचवू जीवन घडवू ..आपण मुलांना जेवढे सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो.तेवढेच पर्यावरणाला वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा. पर्यावरण शिक्षण ही काळाची गरज आहे ..तरच भावी जीवन सुखी आणि आनंदी होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....