कुतूहल साडीचे......

         आज 21 डिसेंबर म्हणजे जागतिक साडी दिवस.
मागे एकदा असेच साडी दिवसाच्या निमित्ताने एकदा लिखाण केले होते. आज पुन्हा एकदा साडी दिवसाच्या निमित्ताने......
साडी हे असे एक अजब वस्त्र आहे की ज्याचे मला कायम कुतूहल वाटते. कारण साडी आणि माझा कित्येक वर्षांपासून चा घनिष्ठ संबंध आहे.कॉलेज मध्ये असताना  उच्च शिक्षनासाठी एम एस्सी ला असताना welcome कार्यक्रमात सर्वांनीच साडी घालण्याचे ठरवले होते.तेव्हा पहिल्यांदाच साडी घालण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर बी एड ला असताना फक्त lesson घेताना/पाठ घेताना साडी घालण्याची सक्ती होती. तेव्हा मात्र  साडी ह्या लांबलचक वस्त्राविषयी प्रचंड राग, चीड होती.पुढे शिक्षकी पेशात आल्यावर मात्र साडी शी चांगलेच घनिष्ठ नाते जुळले.सतत सात तास अंगावर  असले वस्त्र गुंडाळणे भयंकर वाटायचे.अर्थातच आताही वाटते फार तर कामावरून आल्यावर फक्त तिला  5 मिनिटात अंगावरून काढले म्हणजे हायसे वाटते. परंतु आता साडीवर चांगलेच प्रेम जडलेय. घरातील साडीचा कप्पा उघडताच  अंगावर साड्या पडून आपली साड्यांनी लूट होण्याइतपत परिस्थिती झालीय. हल्ली साडी खरेदीसाठी  मैत्रिणींसोबत एखाद्या भाभी, चाची, भैय्या,ताई, दिदींकडून साडी खरेदीसाठी जाणे म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. साड्यांच्या दुकानात जाणे म्हणजे एक प्रकारे आय व्हिटॅमिन घेणेच असते.कितीही
 ताण असला तरी  साडी खरेदी केली की ताण क्षणात कधी नाहीसा होतो कळतही नाही .त्यातल्या त्यात साडी खरेदीच्या अनेक पर्यायापैकी  एक अजून सापडलेला मार्ग म्हणजे ऑनलाइन शॉपिंग.
आता मात्र साडी माझी चांगलीच मैत्रीण झालीय.
कोणताही सोहळा, घरगुती सण समारंभ असो किंवा कॉर्पोरेट मिटींग असो, एखादे ऑनलाईन, ऑफलाईन वर्कशॉप असो साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. शरीरयष्टी कशीही असली, रंगरुप कसेही असेल तरी प्रत्येक स्त्रीला साडी शोभूनच दिसते.  साडी  नेसणाऱ्या स्त्रीची उंची कमी असो किंवा जास्त असो, रंग काळा असो किंवा गोरा असो,सडपातळ असो किंवा लठ्ठ असो, स्त्री सुडोल असो किंवा नसो, स्त्री ह्या वस्त्रात,इतर कोणत्याही वस्त्रा पेक्षा सुंदरच दिसते.
 अश्या ह्या साड्यांचे  असंख्य प्रकार, नेसायच्या पद्धती, अगणित रंगसंगती असलेले आणि कोणत्याही स्त्रीला शोभून दिसणारे साडी हे जगातील एकमेव वस्त्र असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सातत्याने बदलत गेलेले पण कायम सांस्कृतिक, सामाजिक मान्यतेचा मानदंड बनून स्थिरावलेले असे काय आहे आपल्या भारतीय वस्त्र संस्कृतीत? तर उत्तर येते 'साडी'. बदलत गेलेले पण तरीही सातत्याने हजारो वर्षे वापरात राहिलेले,  हेच वस्त्र. आपल्या भारतीय विविधतेतील एकता याचे अत्यंत मार्मिक उदाहरणही तीच साडी. हजारो वर्षांपासून स्त्रीचे सौष्ठव दाखवू शकणारे, चित्ताकर्षक, देखणे, न शिवता परिधान करता येणारे असे हे वस्त्र. त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे. साडी हा वैश्विक वस्त्र संस्कृतीतला सगळ्यात जुना आणि अजूनही वापरत राहिलेला वस्त्रप्रकार आहे. अश्या ह्या प्रकाराची माहिती मी इंटरनेट वरून मिळवली.
साडी हे नाव संस्कृत 'शाटी' म्हणजेच कापडाची पट्टी यावरून आले आहे. त्याचेच प्राकृत रूप साडी. जुन्या जातक कथा मध्ये स्त्रीच्या वस्त्रा संबंधी सट्टिका या शब्दाचा उल्लेख येऊन गेलेला आढळतो. बदलत्या वस्त्रविश्वाचा आढावा घेताना भारतीय स्त्रीच्या वस्त्रसंस्कृतीची कशी उत्क्रांती होत गेली, हे बघत आपण जाऊन पोहोचतो ते थेट सिंधू संस्कृतीत. तसे कापसापासून वस्त्र तयार करणे हे मेसापोटेमियन संस्कृतीत सुरू झाले होते. तिथूनच हे सिंधू संस्कृतीत प्रवेश करते झाले. त्यामुळे लंगोट नेसण्याच्या आत्ताच्या पद्धतीने त्या काळात असे वस्त्र नेसले जायचे. देहाच्या वरच्या भागात काही नेसायची पद्धत पुढेही अनेक वर्षे भारतात नव्हती. अगदी थंडीच्या दिवसात प्राण्यांच्या कातडीने वरचे अंग झाकले जाई. त्यामुळे गळ्यात विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल असे. 
मुळात आपल्या देशातल्या प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रकारच्या तापमानाने फार कपडे घालणे ही कधीच आवश्यकता नव्हती. त्यामुळे भारतीय वस्त्रसंस्कृतीत कपड्याचे महत्त्व हे जास्त सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रकारचे आहे. नंतर आर्य लोकांकडून 'वस्त्र' हा संस्कृत शब्द मिळाला. उत्तर भारतात  सर्वांगाला गुंडाळलेले एक कापड असाच स्त्रियांचा वेष दिसतो. यात परिधान म्हणजे अंतरीय म्हणजेच कमरेला नाडीसदृश धाग्याने (मेखलेने) धरून ठेवलेले वस्त्र, थंडीत प्रवर म्हणजे चेहरा झाकण्यासाठी आच्छादन आणि उत्तरीय जे शाली सारखे खांद्यावरून घेतले जाई. नंतरच्या काळात कमरेवरच्या कायाबंधाला वस्त्र खोचले जाऊन त्याच्या निऱ्या आताच्या धोतरासारख्या खोचल्या जाऊ लागलेल्या त्या काळात सापडलेल्या चित्रांवरून आणि पुतळ्यांवरून दिसते. काही शतकानंतरच्या काळात शिवलेले कपडे दिसायला लागतात. याच काळात घागरासदृश वस्त्र नेसायला सुरुवात झालेली दिसते. तसेच शिवलेल्या चोळ्याही चित्रांमध्ये दिसू लागतात. याआधीच्या काळात कंचुकी म्हणजेच वस्त्राचा एक पट्टा छाती झाकायला वापरलेला दिसतो.
पर्शियन लोक शिवण्याची कला आपल्या सोबत घेऊन आले आणि भारतीय स्त्रियांच्या वस्त्रसंस्कृतीत बदल होऊ लागले. याच काळात अजंठ्या मधील चित्रांमध्ये शर्टासारखे जॅकेट ब्लाउझ म्हणून वापरायला सुरुवात झालेली दिसते.कालौघात या जॅकेटचे स्वरूप बदलत ते आखूड आणि फक्त छातीवर तंग बसणारे असे वस्त्र म्हणजेच चोळी म्हणून वापरले जाऊ लागले.नंतर तेराव्या शतकात 'चंदनाची चोळी' शब्द येऊन गेलेला आढळतो. या चोळीवर वस्त्राचा ओढून घेतलेला भाग म्हणजेच पदर. हा पदर मात्र आपण रोमन संस्कृतीतून घेतला आहे. रोमन लोकांमध्ये वस्त्राचा एक भाग पुढे ओढून तो डाव्या खांद्यावर टाकलेला असे. ही झाली साडीची ओरिजिनल स्टाईल. असेच दोन पायांच्यामधून वस्त्र नेऊन मागे खोचले जाई आणि पुढे पदर ही झाली नऊवारी पद्धतीने साडी नेसायची सुरुवात.
नंतरच्या काळात मात्र अशा काष्टा पद्धतीने साडी नेसणे हळूहळू मागे पडत अंतरीय लुंगी सारखे गुंडाळले जाऊ लागले. सकच्छ साडी महाराष्ट्र आणि दक्षिणेपुरतीच नेसली जाऊ लागली. त्यामुळे उत्तर भारतीय साडी नेसणे हे गुंडाळून आणि आपले नऊवारी नेसणे हे निऱ्या मागे नेऊन खोचणे असा फरक तयार झाला. अशा प्रकारे आपल्या खंडप्राय देशात  या साडी नेसण्यात थोडेसे फरक करत आपले वेगळेपण टिकवू शकले आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीवर साडीचा पडलेला हा लक्षणीय प्रभाव आहे. पुढे जाऊन सौंदर्यीकरण होऊ लागले. तलम कापड, नक्षीकाम, कलमकारी, जरीचा वापर, कुंदनचा वापर, सिल्क मार्गाने येणारे उत्कृष्ट सिल्क अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव वस्त्र सजवण्या मध्ये होऊ लागला. पुढे जाऊन चेहरे झाकण्याची पद्धत सुरू झाल्याने पदराची लांबी वाढली. सलवार कमीझ सारखी वस्त्रप्रावरणे थंड प्रदेशात लोकप्रिय होऊ लगली. याच काळात साडी घागरा पद्धतीने नेसताना पारदर्शक वस्त्रामागे अवयव झाकण्यासाठी मध्ये घागरा घातला जाऊ लागला. त्यावर घ्यायचा दुपट्टा ही साडीची वेगळी स्टाईलही लोकप्रिय होऊ लागली.नंतरच्या काळात  कापडशौकाचा परिणाम म्हणून निरनिराळ्या गावांत विणल्या जाणाऱ्या वस्त्रांमुळे त्या गावांची महती वाढली. बनारसी, बांधणी, पटोला, चंदेरी, महेश्वरी किती नावे घ्यावी. या सर्व ठिकाणांच्या साड्या आपण आजही हौशीने वापरतो.
यानंतरचा काळ म्हणजे भारतातले ब्रिटिश राज्य. तो युरोपातल्या स्त्रीने डोक्यापासून पायापर्यंत सर्व झाकलेले असण्याचा व्हिक्टोरियन कालखंड. त्यानंतर  स्त्रिया पाश्चात्त्य पद्धतीचे 'ब्लाउझ' घालून साडी नेसू लागल्या. जे सोयीचे आहे ती पद्धत आपोआप रुळत जाते, या नियमाला याही वेळी अपवाद न होता सर्वच प्रांतांत लज्जारक्षणासाठी ब्लाउझ घातलेच जाऊ लागले. अर्थातच या ब्लाउजावर पाश्चात्त्य प्रभाव जास्त होता. महाराष्ट्रात याच काळात नऊवारी साडी काष्टा पद्धतीने नेसली जात होती.  या प्रकारच्या साडीत स्त्रीचे सौंदर्य आणि सौष्ठव खूलून दिसते, असे कित्येकांचे मत होते
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राला बालगंधर्व यांनी नाटकांमधून नऊवारी साडीतली मूर्तिमंत शालीनता तमाम मराठी स्त्रियांवर गारूड केली. त्या काळात स्त्रियांची साडी नेसायची पद्धत चक्क एका पुरुषाने बदलली. दोन्ही खांद्यांवर पदर आणि पाय उघडे न दिसणारी नऊवारी पैठणी नेसलेली संगीत शाकुंतल मधली शकुंतला बनून आलेल्या बालगंधर्वांनी मराठी साडीचे एक युग अक्षरशः गाजवले.मी सुध्दा बालगंधर्वांची संगीत नाटके बघितली  त्यांच्या नाटकात नेसल्या गेलेल्या प्रकारांच्या पैठण्या शालूंनी बऱ्यापैकी  आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातली कपाटे भरू लागली. 
 यानंतरच्या काळात साडीवर जसा इतिहास भूगोलाचा प्रभाव पडत गेला, तसाच चित्रपटसृष्टीचाही मोठा प्रभाव पडत गेला. सध्या सुरू असलेली फुग्याच्या बाह्यांच्या ब्लाउझची फॅशनही तेव्हाचीच.  साठचे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळातल्या सर्व नायिका साडीतच दिसत. साड्यांचा पदर पिन लावलेला याच काळात कधीतरी चित्रपटसृष्टीत दिसायला लागला.  सौंदर्यवती अभिनेत्री साडीत अतिशय मोहक दिसत, तरी साडी नेसायची पद्धत अगदी साधीसुधी असे. पदर बहुधा एकत्र पकडून पिन लावणे इतपतच साडी नेसणे असे. अंगप्रत्यंग दाखवणारी चोपून बसवलेली साडी नेसायची अगदी नवी पद्धत काही चित्रपटांमधून आली. नंतर यश चोप्रांच्या सिनेमातल्या नायिका साडी मध्ये विलक्षण देखण्या दिसत. त्या साड्यांमुळे पेस्टल रंगाच्या, शिफॉनच्या प्लेन साड्या लोकप्रिय झाल्या. आत्ताच्या काळातल्या नायिका सुद्धा स्टाइल स्टेटमेंट म्हणून साडी हिरिरीने वापरताना दिसतात. अश्या ह्या साडीवर कितीतरी गाणी लिहिल्या गेली .विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या शोभायात्रेत तरुण मुली आवर्जून नऊवारी साडी नेसताना दिसतात.  परंपरा म्हणून साडी हवीच आहे.शाळा कॉलेजात कोणत्याही कार्यक्रमाला आवर्जून प्राधान्य दिले जाते ते म्हणजे साडी ह्या पोशाखाला.
आत्ता तर कित्तीतरी  आकार,प्रकार उपलब्ध आहेत साड्यांचे. जितके साड्यांचे प्रकार तितकेच ब्लाउज चे सुध्दा प्रकार अगदीच  विविध डिझाइन टाकून शिवून घेतलेल्या ब्लाउज पासून ते रेडी ब्लाउज पर्यंत, हल्ली हल्ली तर स्ट्रेचेबल ब्लॉउझवर भर आहे जेन झी चा.
साड्या अनेक प्रकारच्या घालून देण्याचे workshop सुध्दा घेतले जाते. अनेक सोशल मीडिया वर साडी नेसून देण्याचे व्हिडीओ देखील दाखवले जातात.काळानुसार साडी प्रकारात बद्दल झाले .साडी नेसायचा कंटाळा येणाऱ्यांसाठी आता रेडी टू विअर प्रकार उपलब्ध आहेत.
मला मात्र हल्ली हल्ली आवडायला लागलेला साडीचा प्रकार म्हणजे महेश्वरी,चंदेरी साडी.इतके वर्षे झालीत तरीही साडी  नेसताना मला आजही 5 सेफ्टी पिन्स लावल्याशिवाय साडी जमतच नाही. परंतु 5 मिनिटांत नक्कीच नेसता येते.
महिलांचे कोणतेही कार्यक्रम असो त्यामध्ये सर्वांचेच लक्ष आकर्षून घेणारी वस्तू म्हणजे साडी. एखादिची साडी आवडली म्हणजे तिच्याकडे येनकेन प्रकारे जाऊन तिला त्या साडीविषयी विचारणे कुठुन घेतली, किंमत काय वगैरे वगैरे. एक मात्र नक्कीच की तिच्या साडीला छान म्हणून मोकळ्या होताना दिसतात.साडी छान दिसते असे म्हणतात, तिला छान दिसते असं कधीतरी म्हणतात.
स्त्री कितीही मोठया पदावर असली, कितीही मोठया स्टेजवर असली तरिही एखादीची साडी जर तिला आवडली तर तिचे लक्ष खेचले जाऊन त्या साडी घालणारी कडे जाऊन ती त्या विषयी विचारलेच.
आणि जिच्या साडीला विचारले तिला तिच्या  साडीचे पैसे वसूल झाल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो.मला असले प्रसंग बरेच येतात.हल्ली एका साहित्य संमेलनात गेले असता चक्क संमेलन अध्यक्ष ताईंनी येवून चक्क माझ्या साडीची तारीफ केली होती. मग काय क्षणभर का होईना माझी थोडीशी उंची वाढल्याचा भास मात्र नक्कीच झाला होता ,असो.
साडी मध्ये जी प्रेमाची ऊब आहे ती कोणत्याच वस्त्रात नाही. मला आठवते माझा शाश्वत लहान असताना त्याच्यासाठी स्वतःच्या कॉटन च्या साड्यांच्या शिवलेल्या 
रजया  त्याच्या पाळण्यात ठेवून  ड्युटी वर जायची तेव्हा त्याकडे बघून त्याला छान वाटायचे.कितीही नवनवीन प्रकारचे टॉवेल्स स्पंज च्या गाद्या इतरही बेबी किट असल्या तरी मम्माच्या साडीची गोधडी त्याला खूपच आवडायची.त्याच्या बालपणात मला माझे सुद्धा बालपण दिसायचे. आई ड्युटी वरून आली की आम्हा भावंडांची शर्यत लागायची पहिले धावत जाऊन कोण आईच्या साडीला पकडून तिच्या कुशीत शिरतो.लहानपणी आईचा पदर एखाद्या सिक्युरिटी गार्ड प्रमाणे काम करायचा. आई कुठेही गेली म्हणजे तिच्या पदराला धरून चालण्यात खूपच आनंद वाटायचा. कोणाकडे गेलो म्हणजे तिच्या पदराआड लपून बसने असले प्रकार व्हायचे.अजूनही मला अंगणातील जुईच्या कळ्या पानांआडून डोकावताना दिसल्या की आईच्या साडीचा पदराची आठवण येते..तिची पाने म्हणजे तिचा पदर आणि इवल्याश्या  कळ्या म्हणजे तिची मुले .बाबा अभ्यासासाठी ओरडले की आईच्या साडीच्या पदराआड जाऊन लपायचे.
 माझी आई किंवा तिच्यासारख्या असंख स्त्रिया मात्र एक किंवा दोनच पिन लावून दिवसभर ड्युटी किंवा बाहेरील कामे करायच्या याचे कौतुक वाटते.
असो साडी विषयी कितीही लिहिले तरी ते कमीच पडणार, कारण विषयही तसाच जिव्हाळ्याचा आहे.
आहे न 'कुतूहल'साडी ह्या अजब वस्त्राचे.


#साडी
#साडी डे
#कुतूहल साडीचे

संदर्भ-काही माहिती इंटरनेट, व्हाट्स अप मेसेज

@उज्वला तायडे, अकोट



Comments

  1. खूप छान माहिती दिली दिली साडीची आणि साडी संदर्भातले खूप छान अनुभव लिहिले.

    ReplyDelete
  2. "साडी ही केवळ वस्त्र नसून, ती एक भावना आहे… प्रत्येक वळणावर एक नवीन कुतूहल उलगडतं."

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....