'कुतूहल' पाऊस पडण्याचे..........🌧️⛈️🌨️🌧️💧


     ये रे ये रे पावसा....... हे गाणे लहानपणी सर्वांनीच म्हंटले असेल. आणि पावसात भिजण्याचा आनंद सुद्धा घेतला असेल.अगदी हक्काने आपण पावसाला बोलावतो, तेही त्याला पैसा देण्याचे आमिष दाखवून.सर्वांनाच हवाहवासा असणारा हा पाऊस पडतो तरी कसा?माझा शाश्वत लहान असताना पाऊस पडला की विचारायचा  आकाशाला खूप मोठा शॉवर कसा काय बसवत असतील?मग तो नेहमी करता का नाही बसवत?पाऊस कसा पडत असेल?असे विचारायचा शाश्वत सारखे प्रश्न बहुतेक मुलांना पडत असतील.

     उन्हाळा सहन केल्यानंतर पृथ्वी ओलाव्यासाठी आसुसलेली असते. त्याचीच परिणीती म्हणून पाऊस सुरू होतो आणि सर्व निसर्ग आणि सजीव सृष्टी सुखावते.पाऊस सुरू झाला की सर्वत्र विशिष्ट प्रकारचे चैतन्य पसरते. त्या चैतन्याने सर्व सजीवसृष्टी न्हाऊन निघते.पाऊस पडणे ही एक नैसर्गिक  हवामानविषयक घटना आहे.धरतीवर असलेल्या एकूण  पाण्याचं सतत  अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात.

वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात.वाऱ्याच्या वहनाचे कार्य सुरू असते, वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात फिरता फिरता एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत म्हणून ते जमिनीच्या दिशेने झेपावतात. मग काय ,वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात.ही चढाओढ मात्र चालूच राहते ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातातआणि पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषके नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं,निरंतर.


     उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश हा जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात.

त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो.

या पावसाचेही खूप प्रकार आहेत.प्रत्येक व्यक्तीला आवडणारा पाऊस वेगळा असतो.साधा पाऊस , रिमझिम किंवा झिमझिम पाऊस, पर्जन्य, पावसाच्या धारा किंवा सरी, मुसळधार पाऊस, पावसाची रिपरिप/पिरपिर , संततधार/पावसाची झड, नागडा पाऊस,शिरवे/धावता पाऊस, गारांचा पाऊस/गारपीट , अतिवृष्टी ,हिमवर्षा , हिमवर्षाव,बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस , हिमवादळ  हलका पाऊस , तुरळक पाऊस , विखुरलेला पाऊस , थांबून थांबून पडणारा पाऊस, सार्वत्रिक पाऊस , गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस, वादळी पाऊस/पावसाचे वादळ ,मोसमी पाऊस, नैर्ऋत्य मोसमी पाऊस , ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, उन्हाळी पाऊस, हिवाळी पाऊस ,बारमाही पाऊस , अवकाळी (किंवा अवकाळ्या) पाऊस, रात्रीचा पाऊस , धडकवणी/मृगाचा पाऊस/वळवाचा पाऊस/वळीव ,हस्ताचा पाऊस/पर्जन्य  ,सरासरी पाऊस/पर्जन्यमान , वार्षिक पाऊस , पर्जन्यछाया , पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस , कृत्रिम पाऊस , ढग फवारणी/मेघारोपण .यातील सर्वच पाऊस महत्वाचे आहेत फक्त 'आम्ल पाऊस'एक प्रकार वगळता.आम्ल पाऊस हा रासायनिक अभिक्रियेमुळे होतो जो सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखी संयुगे हवेत सोडल्यावर सुरु होते. हे पदार्थ वातावरणात खूप उंचावर जाऊ शकतात, जिथे ते पाणी, ऑक्सिजन आणि इतर रसायनांसह मिसळतात आणि प्रतिक्रिया देतात ज्यामुळे अधिक अम्लीय प्रदूषक तयार होतात, ज्याला आम्ल पाऊस म्हणतात.आम्ल पाऊस शेती, वनस्पती आणि प्राण्यांसाठी अत्यंत हानिकारक आहे.तसा पाऊस  नेहमी किंचित अम्लीय असतो कारण तो हवेत नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या ऑक्साईडमध्ये मिसळतो.पण इतर सर्व प्रकारचे पाऊस सर्वांच्याच आवडीचे आहेत.

अशा या पावसांवर कवींनी कित्तीतरी कविता, गाणी तयार केली, त्यावर कित्येकांनी कथा, गोष्टी, कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या.एकंदरीत पाऊस म्हणजे साहित्यिकांसाठी आनंदाची पर्वणीच आहे.ग. दि. माडगूळकर यांचे सर्वांचे परिचयाचे असलेले गीत म्हणजे नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच !......आणि त्यांचेच आणखी माझ्या आवडीचे गीत म्हणजे ..घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा......बालकवींची कविता सर्वांच्या परिचयाची....श्रावणमासी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे..........या आणि अशा गीतांमुळे पावसावरचे प्रेम आणखी वाढत गेले.

पाऊसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्ण पृथ्वीवर पाण्यामुळेच जीवन आहे त्यामुळे पाण्याला पंचतत्वांपैकी सर्वात महत्त्वाचे समजले जाते. पृथ्वीवरील पाणीच पुन्हा प्रत्येक वर्षी पाऊसाच्या रूपाने ताजेतवाने होऊन परत पडत असते.पाण्याने झाडे, प्राणी, पक्षी आणि मानव देखील आनंदीत होत असतो. आहे न कुतूहल पावसाचे....


@सौ. उज्वला तायडे, अकोट

संदर्भ-काही माहिती इंटरनेट वरून

#पाऊस#पाऊस कसा पडतो



Comments

  1. खूप सुरेख माहिती मांडली आहे

    ReplyDelete
  2. सर्वांना आवडणारा पाऊस ,सृष्टीला नटवणारा पाऊस, खूप छान माहिती दिली .. पाऊस यायला थोडा जरी वेळ झाला तर मनात येणारी गाणी ...येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना..... आणि पाऊस आला की मनाला आनंद देणारे गाणी
    घन ओथंबून येती...

    जल ही जीवन है

    ReplyDelete
  3. "पावसाच्या प्रत्येक थेंबात एक कथा असते… आणि त्या कथांमध्ये लपलेलं असतं बालपणाचं कुतूहल!"....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....