'कुतूहल' फास्टफूड चे......


        16 nov म्हणे फास्टफूड डे आहे म्हणे आज, लवकर काहीतरी नवीन बनव ब्रेकफास्ट ला असं जेव्हा मुलगा म्हणाला की तेव्हा कळलं फास्टफूड डे पण असतो.

एकविसाव्या शतकात वेगवान आयुष्याच्या नावाखाली माणसाला एक वाईट सवय जडली आहे, फास्ट फूड खाण्याची. चाट, वडापाव आणि बर्गर अगदी कमी वेळात बनवून मिळतो.
फास्ट फूड म्हणजे काय? तर असे अन्नपदार्थ जे लवकरात लवकर तयार करून लगेच खायला देता येते आणि  खाणाऱ्या ग्राहकालाही ते पटकन किंवा उभ्या उभ्या देखील खाता येते. अगदी गाडी चालवताना, चालता-चालता, शाळेत मधल्या सुटीत पटकन खाता येतील असे पदार्थ म्हणजे फास्ट फूड.
जिथे आरामात बसण्याची गरज भासत नाही, काटे चमचे प्लेट्स यांचीही फारशी गरज नसते, अशी व्यवस्था म्हणजे फास्ट फूड शॉप! आपल्याकडे गल्लोगल्ली आढळणाऱ्या वडापाव, पाणी-पुरी, भेळपुरी, चायनीज यांच्या टपऱ्या म्हणजेच फास्ट फूड शॉप्स!

फास्ट फूड हे सहसा तळलेले किंवा गोड असते. आपल्याकडे जे पदार्थ टपरीत किंवा हातगाडीवर बनवले जातात ते त्याच तेलात वारंवार तळतात. असे वारंवार तळलेले पदार्थ आरोग्याला फारच हानिकारक असतात. कारण त्यात आरोग्याला घातक असे ट्रान्स-फॅट असतात. शिवाय हे पदार्थ अधिक काळ टिकविण्यासाठी त्यात मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात घातली जाते.  त्यात जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक घटक फार कमी प्रमाणात असतात कारण फास्ट फूडमध्ये भाज्या किंवा फळे नसतात किवा असली तरी जास्त शिजवल्या किंवा तळल्यामुळे त्यातले पोषक अन्नघटक नष्ट झालेले असतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फास्ट फूडमध्ये आरोग्यास उपयुक्त असा चोथा आणि प्रथिने कमी आणि आरोग्यास हानिकारक असणाऱ्या ट्रान्स-फॅट आणि कॅलरीज  मुबलक प्रमाणात असतात.चोथा आणि प्रथिने कमी असण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये कडधान्ये अभावानेच असतात. फास्ट फूडमध्ये असलेल्या अतिरिक्त उष्मांकांमुळे (कॅलरीज मुळे) लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या दुर्धर व्याधी जडतात. आपल्याला हे रोग व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? नाही ना? मग फास्ट फूड, जंक फूड टाळण्यास पर्याय नाही!
जंक फूड या शब्दाचा अर्थ “कचरा अन्नपदार्थ” असा होतो. जे शरीराला उपयुक्त नाही परंतु खावेसे (किंवा हवेहवेसे) वाटते आणि ज्यात पोषक द्रव्ये नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात असे पदार्थ म्हणजे जंक फूड! प्रत्येक जंक फूड फास्ट फूड असते पण प्रत्येक फास्ट फूड हे जंक फूड असेलच असे नाही. उदा. चिक्की किंवा भाजके चणे हे फास्ट फूडच्या व्याख्येत येतात पण त्यांना जंक फूड म्हणता येणार नाही.
उलट हे दोन्ही पदार्थ विशेषतः  लहान मुलांसाठी पोषक आहेत. जंक फूड आणि फास्ट फूड असा भेद करता येणे अवघड असले तरी कोणते पदार्थ टाळायचे हे लक्षात घेतल्यास आपले जगण्यासाठी खाणे सोपे होईल.

पर्याय नसतो म्हणून किंवा आवड असते म्हणूनही आजकाल फास्ट फूड टाळता येत नाही. पण ते खायचंच असेल  तर त्याचे दुष्परिणाम माहीत असायला हवेत आणि ते आरोग्यदायी करण्याचे मार्गही माहीत असायला हवेत.

कधी वेळ नाही म्हणून, कधी जरासा चेंज हवा म्हणून, तर केव्हा तरी पार्टी आहे, म्हणून आपण सतत फास्ट फूड पोटात ढकलत असतो. आजच्या फास्ट लाइफमध्ये फास्ट फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जे मिळेल ते आणि वेळ मिळेल तेव्हा खायचे, ट्रेन व बसने ऑफिसला पळायचे व मिळेल तेवढा वेळ झोपायचे, हे असे जीवन आज बरेच जण जगत आहेत याची आपल्याला कल्पना आहेच. अशा वेळी बाहेर खाणे हा एकमेव पर्याय असतो. बऱ्याच लहान मुलांना पालक सांगतात, आपले अन्न सकस असावे, वेळेवर जेवावे. पण मोठय़ांचे काय? त्यांनाही नाइलाजाने का होईना या पदार्थाचा आसरा घ्यावा लागतो. एकटे राहणारे किंवा नवरा बायको नोकरी करणारे असल्यामुळे वेळेअभावी सतत बाहेरचे अन्न खावे लागते. झटपट तयार होणारे पदार्थ आणि त्यांची जिभेवर रेंगाळत राहणारी चव यामुळे फास्ट फूड न आवडणारा मनुष्य शोधूनही सापडणार नाही.


  • इडली, उपमा, डोसा इत्यादी
  • लापशी, खीर (साखर बेताची असावी),
  • थालीपीठ, पराठा,
  • भाजके चणे, शेंगदाणे (कच्चे असल्यास उत्तम), चिक्की
  • ओल्या शेंगा (भुईमूग), हिरवा वाटाणा, मक्याचे कणीस
  • काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी
  • नेहमीचे घरगुती जेवणाचे पदार्थ: चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी
  • जास्त चोथायुक्त पदार्थ
  • डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
  • मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
  • हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
  • पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
  • आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
  • कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
  • गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
  • पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
  • पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
  • व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच हे पदार्थ नियमितपणे खावेत, शक्यतो घरीच बनवले असावे.
  • पिझ्झा, बर्गर, रोल वगैरे फास्ट फूडचे सर्व प्रकार
  • वडे, समोसे, बाकरवडी, भजी, कांदा-भजी, इत्यादी तळलेले पदार्थ
  • केक, पेस्ट्री, टोस्ट, बटर, खारी नानकटाई इत्यादी बेकरीचे पदार्थ
  • सर्व प्रकारची बिस्किटे (अगदी मारी सुद्धा!)
  • पेढे, बर्फी, जिलेबी, रसगुल्ले, गुलाबजामून, रसमलाई, लाडू इत्यादी मिठाया
  • सर्व शीत पेये (कोकाकोला, पेप्सी इत्यादी)
  • आईस्क्रीम, कुल्फी इत्यादी.शक्यतो हे पदार्थ कटाक्षाने खाणे टाळावे किंवा वर्षातूनएकदा, दोनदा खावे.


Comments

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....