'कुतूहल'करंजीला मुरड घालण्याचे......
साटाच्या करंज्या म्हणजे अनेक पदर असलेली करंजी…ही करंजी करायला थोडी अवघड असली तरी दिसायला आणि चवीला मात्र अप्रतिम लागते. बऱ्याचदा गौरीगणपतीच्या फराळासाठी आणि लग्नात रुखवतीसाठी साट्याची करंजी केली जाते.ओल्या नारळाची करंजीदेखील महाराष्ट्रात सणासुदीला आवर्जून केली जाते. मात्र ही करंजी जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यामुळे या करंज्या एक ते दोन दिवसात खाव्या लागतात.जर तुम्हाला नेहमीच्या बेसन अथवा रवा,खोबऱ्याच्या करंजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही खास माव्याच्या कंरज्या नैवेद्यासाठी करू शकता.पुरणाची कंरजीदेखील खास नैवेद्यासाठी केली जाते. महाराष्ट्रात या करंजीला कडबू असं ही म्हणतात. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी अथवा मधल्या वेळी खाण्यासाठी, एखाद्या खास कार्यक्रमासाठी तुम्ही मटार करंजीचा बेत करू शकता. या करंज्या खायला स्वादिष्ट आणि खुशखुशीत लागतात. थोड्या वेगळ्या पद्धतीच्या करंज्या करायच्या असतील तर रव्याच्या कुरकुरीत कंरजी बनवू शकता. या कंरज्या देखील जास्त दिवस टिकतात.
श्रावणात सदासुदीला काही ठिकाणी तिळाची करंजी करण्याची पद्धत आहे. तीळ आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे पावसाळ्यात थंड हवामानात या करंज्या आवर्जून खाव्या.मलाही तीळगुळाच्या करंज्या खूप आवडतात.
उत्तर भारतात होळीच्या सणाला गुजिया बनवल्या जातात. आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात गुजिया मिळत असल्यामुळे घरच्या घरी करंजीचा प्रकार ट्राय करायला हरकत नाही.
नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटेल.
आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.
गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.
बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.
या सर्व पदार्थांत माझ्या कायम स्मरणात राहणारा, आणि आवडणारा पदार्थ म्हणजे आईने शिकवलेली मुरड घातलेली करंजी.आईची एक गोड आठवण.
कानवला सुद्धा म्हटले काही ठिकाणी करंजीला.कानवला याचा ग्रामीण भाषेतील अर्थ आहे, कानासारखी आकार असलेली मोठी करंजी .किंबहुना याचा आकार साधारणपणे चांद्रकोरीसारखा दिसतो.या कानवल्याची दोन्ही टोके चिकटवून घेतल्यानंतर काठाला नखाने मोहक अशी मुरड घातली जाते.
'कर्णवलय'या संस्कृत शब्दापासून तयार झालेला हा शब्द एकेकाळी ग्रामीण बोलीत एकेकाळी चांगलाच रूढ झाला होता.वस्तूच्या आकारावरून व स्वरूपावरून नविन शब्द तयार करणे हा कोणत्याही लोकसमूहाचा विशेष असतो.
करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.
वृद्धांच्या सगळ्याच गोष्टी तरुण पिढीला पटत नाहीत. मग उगाच कुरबुरी सुरू होतात. त्या टाळायच्या असतील, तर तरुणांनी थोडं जेष्ठांना समजून घेतलेलं बरं.तरुणांच्या सर्वच गोष्टी वृद्धांना ,जेष्ठांना आवडतील असं काही नाही, तेव्हा तरुणांनी सुध्दा स्वतःवर करंजीसारखी थोडी मुरड घालायला शिकले पाहिजे.
जेष्ठांनी, वृद्धांनीआपल्या पध्दतीचं आयुष्य आपल्याला हवं तसं जगून झालेलं असतं. मग उतारवयात थोडं नव्या पिढिसारखं जगून बघायला काय हरकत आहे?
पूर्वी घरात असा पदार्थ भरपूर प्रमाणात केला म्हणजे घरातील लोकांना पर्वणीच वाटायची .दिवसभर तो खाल्ला जायचा आणि उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खाण्याची मजा काही औरच.आज डायबेटीस असलेल्या व्यक्ती हे खाऊ शकत नाहीत आणि लहान मुले तर मागत सुद्धा नाहीत.पिझ्झा बर्गर, पुढे हे पदार्थ फिके वाटतात त्यांना. तेव्हा आपणच जर आपल्या पदार्थांची जपणूक करून आपल्या मुलांना ह्या पदार्थांची गोडी चाखायला दिली तर नात्यांमधील गोडवा कायम ठेवून काही गोष्टींवर मुरड घालता येईल करंजीसारखी....
#'कुतूहल 'मुरड घातलेल्या करंजीचे
# मुरड#करंजी
संदर्भ -काही माहिती इंटरनेट
काही चित्रं - इंटरनेट वरून
@सौ. उज्वला तायडे, अकोट

Khul chhan
ReplyDelete