'कुतूहल' झाडांना पाणी देण्याचे.....🌱💦

बऱ्याच वेळी ,बऱ्याच लोकांना हा प्रश्न निर्माण होत असतो की झाडाला पाणी नेमकं केव्हा द्यावं.माझ्या शेजारच्या मावशी तर झाडाखाली थोडं जरी कोरड दिसलं की लगेच  ,झाड सुकेल म्हणून लगेचच पाणी घालतात ,विशेकरून तुळशीच्या झाडाला, अगदी उन्हात सुद्धा.
पाण्याला समानार्थी शब्द आहे ‘जीवन’. आपल्यासारखेच झाडांसाठीही पाणी म्हणजे जीवनच आहे. मात्र कुंडीतील झाडांना पाणी जास्त झाल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडलेले बऱ्याचदा पाहायला मिळते..
पाणी घालताना प्रथम झाडावर चहूबाजूने थोडंसं पाणी घालावं म्हणजे झाड धुतलं जातं आणि पानं स्वच्छ होतात. त्यामुळे आपली झाडं साहजिकच ताजीतवानी दिसतात. नंतर झाडाच्या बुंध्याशी चहूबाजूने थोडं पाणी घालावं. पाणी घालताना पाण्याच्या धारेखाली हात धरावा. तांब्याने फार वरून पाणी ओतू नये. त्यामुळे मातीत खड्डा पडून माती आजूबाजूला उडते आणि अस्वच्छता होते. पाणी कुंडीच्या  खाली असलेल्या भोकातून थोडंसं बाहेर यायला लागेल इतपतच घालावं. कुंडीच्या आकाराप्रमाणे पाण्याचं प्रमाण बदलेल. उगाच जास्त पाणी घालून पाणी फुकट घालवू नये, तसेच आजूबाजूची जागापण खराब करू नये. सर्वसाधारणपणे कुंडीतील झाडांना रोज थोडं पाणी घालावं.
पाणी घातल्यानंतर कुंडीत थोडा वेळ जरी पाणी साचून राहिलं, अर्थात पाण्याचा निचरा लगेच झाला नाही, तर आपल्या कुंडीत काही तरी बिघाड झालाय असं समजावं आणि त्यावर उपाय करावा. कुंडीचे भोक बुजणे किंवा माती खूप घट्ट होणे ही कारणे त्यामागे असू शकतात. जर उपाय केला नाही तर या साठणाऱ्या पाण्याचे दुष्परिणाम झाडावर हळूहळू दिसू लागतील आणि झाडाची प्रकृती खालावेल. कुंडीत पाणी खूप वेळ साठत असल्यास, झाडावर थोडय़ा दिवसांतच दिसणारा दुष्परिणाम म्हणजे झाडाची पाने अकाली पिवळी पडतात. तसेच कुंडीमध्ये शेवाळं धरू लागते.
पाणी केव्हा घालावं याचं उत्तर म्हणजे आपल्याला वेळ असेल तेव्हा! मात्र, याचं शास्त्रीय उत्तर म्हणजे आपल्या झाडावर ऊन यायला जेव्हा सुरुवात होते त्याआधी झाडांना पाणी घातलं पाहिजे. उदा. आपल्याकडे सकाळी ८ ते २ पर्यंत ऊन येत असेल तर सकाळी आठच्या आधी झाडांना पाणी मिळालं पहिजे. आपल्याकडे जर दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत ऊन येत असेल तर तर दुपारी दोनच्या आधी झाडांना पाणी घालावं. ज्या वेळी ऊन येतं, त्या वेळी पाणी उपलब्ध असल्यास झाडांच्या पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया चांगली होते. पाणी घालण्यासाठी झाडांवर ऊन येण्याच्या आधीची वेळ आणि आपली सोय याची योग्य सांगड घालावी. जास्त पाणी मिळणं किंवा पाण्याचा निचरा लगेच न होणं हे कुंडीत झाड न बहरण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. झाडाला काही झालंय असं दिसलं की, पहिलं काम केलं जातं ते म्हणजे झाडाला पाणी घालणं. झाडाला पाणी हवंय की नको याचा विचार केला जात नाही. जर झाडाची पानं कोमेजलेली वाटली तर प्रथम कुंडीतील मातीला हात लावून बघावा. माती सुकलेली असेल तरच पाणी घालावे, पण माती ओली आहे तरीसुद्धा पाने कोमेजलेली असतील तर पाने कोमजण्याचं कारण वेगळं आहे हे लक्षात घ्यावं. कुंडीतली माती ओली होईल इतकं पाणी आणि पाण्याचा निचरा लगेच होणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
झाडांना पाणी कधी देता? आपल्या इथे दुपारी पाणी न देण्याची पूर्वापारची परंपरा आहे. का देत नाही दुपारी पाणी? कारण अगदी सोपं आहे. दुपारी बाष्पीभवन जास्त होतं त्यामुळे झाडांना पाणी नेहमीच अगदी सकाळी किवा संध्याकाळी द्यावं.
वनस्पतींची पाने, खोड आणि फुले यांच्यामार्फत वनस्पतींमधील अतिरिक्त पाणी सूर्यप्रकाशात बाष्परूपाने बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. बाष्पोत्सर्जन आणि बाष्पीभवन या वेगवेगळ्या क्रिया आहेत. बाष्पोत्सर्जनाची क्रिया घडण्यासाठी ऊर्जेची गरज असते. वनस्पतींमध्ये बाष्पोत्सर्जन प्रामुख्याने वनस्पतींच्या पानांवर असलेल्या पर्णरंध्रांद्वारे होते.
पर्णरंध्रांची संख्या जेवढी अधिक तेवढे बाष्पोत्सर्जन अधिक घडून येते.
 पाणी तरी किती द्यावं? बरेचदा असा गैरसमज आढळतो की झाडांना भरपूर पाणी द्यावं. थोडा विचार करा. आपल्याला पोटाला  लागेल इतकं पाणी आपण पितो .  मग झाडं सजीव आहेत. आपल्या सारखीच! त्यामुळे त्यांना पण पाणी गरजेनुसारच द्या. नाहीतर जमिनीतील पोषक तत्त्वं वाहून जातात. जमिनीची प्रत कमी होते. झाडांना झुळुझुळु पाटाचं पाणी का आवडतं? कारण आपण जसं 'घटघट' पाणी पिऊ शकत नाही तसंच झाडं देखील हळूहळू, छान  पाणी पितात! जमिनीत पाणी मुरेल एवढ्याच वेगाने पाणी द्यायला हवं. तुम्ही तसं देताच! हो नं! मग आता अधिक सजगपणे असं मस्त  पाणी झाडांना घालू या!
समजा तुम्हाला तहान लागलेली नाही आणि तुम्हाला जबरदस्तीने 'पाणी प्या' चा आग्रह केला तर कसं वाटेल? आपला 'टाईम पास' होतो म्हणून झाडांना गरज नसताना पाणी देणं हे त्यांच्यासाठीही हानीकारक आहे आणि आपल्यासाठीही! कारण पाण्याचं दुर्भिक्ष असताना अशी पाण्याची नासाडी केव्हाही वाईटच!
आपण ठिबक सिंचन पद्धतीने सुध्दा पाणी देऊ शकतो.
बागेला पाणी देण्याच्या अनेक पद्धती आहेत.  बागेला किंवा कुंडय़ांना आपण जसे पाण्याची सवय लावू त्याप्रमाणे झाडांना पाण्याचा वापर करण्याची सवय लागते. उपलब्ध पाणी किती व कसे मिळते यावर त्यांच्या बाष्पीभवनाचा वेग झाडे ठरवतात. त्यामुळे पाणी कसे व किती द्यावे हे बागेचे ठिकाण, वाऱ्याचा वेग याचा विचार करून ठरवणे योग्य असते.
बागेला (आपल्याकडे कोणत्या आकाराची आहे त्याप्रमाणे) नेहमी गरजेपुरते पाणी द्यावे. पाणी उपलब्ध आहे मग कितीही द्या असे करू नये. जमिनीवरील बागेत नियोजन करून किंवा झांडाच्या, बागेच्या गरजेचा विचार करून पाणी द्यावे अन्यथा अधिकच्या पाण्यामुळे माती सडते आणि नंतर ती अनुत्पादक होते. कुंडय़ांना पाणी देताना त्यात गरजेपुरता ओलावा राहील एवढेच पाणी द्यावे. कारण अधिकचे पाणी देण्याने कुंडीतील वाफ्यातील सूक्ष्म माती, खतातील सत्त्व हे पाण्याच्या रूपात वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच कुंडीतील लाल मातीचे डाग इमारतीवर ओघळलेल्या स्वरूपात दिसतात. तेव्हा गरज पडली तर दोन वेळा पाणी द्यावे पण ते गरजेपुरते देणे महत्त्वाचे आहे. जसे की उन्हाळ्यात दोन वेळेस पाणी द्यावे. हिवाळ्यात एक वेळेस पाणी द्यावे. तर पावसाळ्यात पावसाचा वेग, वेळ, प्रमाण लक्षात घेऊन पाणी द्यावे. बरेचदा भूरभूर पडणारा पाऊस किंवा पावसाचे वातावरण असले तरी आपण बागेला पाणी देण्याचे टाळतो. पण अशा प्रकारचा पाऊस हा बागेतील, कुंडय़ाची वरवरची मातीच भिजवतो. झाडे मलूल झालेली दिसतात. अशा वेळेस बागेची पाहणी करून त्यास पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाणी सूर्योदयापूर्वी द्यावे. उन्हाळ्यात वातावरणातील उष्मा लवकर जाणवतो अशा वेळेस झाडांच्या पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेगही वाढतो. उशिरा दिलेले पाणी व वातावणातील उष्मा यांचे विषम प्रमाण झाल्यास कुंडय़ा, बाग वाफमय होते. वाफेमुळे झाडांच्या मुळांना वाफ लागून ती कोमेजून जातात. एखादे झाड कालपर्यंत टवटवीत होते आज अचानक मान टाकलेली दिसते. कारण रोपांच्या मुळांना, खोडाला वाफ लागून ते नाश पावतात असे होऊ नये म्हणून सकाळी लवकर पाणी द्यावे. हिवाळ्यात पाणी सायंकाळी द्यावे. सायंकाळी पाणी दिल्याने झाडे सावकाश पाणी ग्रहण करतात. वातावरणात गारवाही असतो.
झाडांना पाणी कधी देता? आपल्या इथे दुपारी पाणी न देण्याची पूर्वापारची परंपरा आहे. का देत नाही दुपारी पाणी? कारण अगदी सोपं आहे. दुपारी बाष्पीभवन जास्त होतं त्यामुळे झाडांना पाणी नेहमीच अगदी सकाळी किवा संध्याकाळी द्यावं.
पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे पोषण करणारी वनस्पती ही एकमेव व्यवस्था आहे. सूर्यप्रकाशामुळे आपले  वनस्पतींचे पोषण होते, मात्र आपण वनस्पतीपासून अन्न  बनवू शकत नाही. त्यामुळे मानव तसेच प्राण्यांना अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून रहावे लागते.अर्थात वनस्पती देखीलकाही प्रमाणात अवलंबून असतात. योग्य निगा राखली गेली तरच त्यांना फुले-फळे येतात. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत. त्यांचा एकमेकांशी परस्परसंबंध आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्यातील एखादी जरी अन्नसाखळी तुटली तरी निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती पूर्ववत करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. वनस्पतींचे वेगवेगळे भाग जून होऊन गळून पडतात. त्यात सुकलेली पाने, फुले, फांद्या आदी घटक असतात. आपण तो ‘कचरा’ पालापाचोळा कचरा समजून स्व च्छ करतो. बाजूला नेऊन एक तर जाळून टाकतो किंवा त्याचे खत बनवितो. जंगलात ही प्रक्रिया नैसर्गिकपणे झाडाखालीच होत असते. शहरात आपण तसे होऊ देत नाही. त्यामुळे जमीन समृद्ध होण्याची प्रक्रिया खंडित होते. ज्याप्रमाणे वनस्पती आपली गरज भागवितात, त्याप्रमाणे ती वेगवेगळ्या कीटकांचीही गरज भागवितात. साधारणत: एका वृक्ष प्रजातीवर तीनशे प्रकारचे कीटक आढळतात. त्यापैकी दोन ते पाच टक्के किडी वनस्पतींच्या पानावर जगतात. उर्वरित किडी मांसाहारी असतात. ते शाकाहारी किडी, त्यांनी घातलेली अंडी व अळ्यांवर आपली उपजीविका करतात. काही कीटक वनस्पतींच्या फुलांचे परागीकरण करण्यास मदत करणारे असतात. उदा. मधमाशा आणि फुलपाखरे.
पाण्याचा बराच मोठा हिस्सा जर उन्हाने उडून जात असेल तर आगामी काळामध्ये पाण्याच्या नियोजनात हे बाष्पीभवन कमी कसे होईल, यावर सर्वाधिक भर दिला गेला पाहिजे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेमध्ये जमिनीवर पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जसा जिरवण्यावर भर दिला जातो तसाच भर येत्या काही वर्षांमध्ये पडलेला एकही थेंब उन्हाने किंवा वार्‍याने बाष्पीभवन होऊन उडून जाणार नाही यावर द्यावा लागणार आहे.
आपल्या कुंडीतील झाडय़ांच्या मातीवर वनस्पतींची वाळलेली पाने आणि आच्छादन टाकले तर कालांतराने ते कुजून त्यापासून खत तयार होते. शिवाय आच्छादनामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. मातीतील जिवाणूंचे त्यामुळे संरक्षण होते. माझेकडे मी झाडांची  सुकलेली पानांचा थर टाकत असते कुंडीत.
आपण घरातील कुंडीमध्ये निर्माल्य, भाजीची देठे, इ. टाकू शकतो. कधी कधी कुंडीतील झाडांवर चिलटे येतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे टाकलेले अतिरिक्त पाणी. त्यामुळे कुंडीत आवश्यक तितकेच पाणी टाकावे. जास्त पाणी टाकले म्हणजे झाड लवकर वाढणार नाही. उलट अतिरिक्त पाण्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यांचे आरोग्य बिघडू शकते. कुंडीतील मातीवरील पानांच्या आच्छादनावर थोडे हळदीचे पाणी शिंपडल्यास चिलटय़ांचे प्रमाण कमी होते.  
झाडांच्या मातीमध्ये ओलावा टिकावा म्हणून त्यात योग्य प्रमाणात सेंद्रीय खते (शेण खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत) टाकणे आवश्यक आहे. मातीमधील पाण्याचा निचरा योग्य वेळेत न झाल्यास मुळांना मातीमधील अन्नद्रव्यांचे शोषण करता येत नाही. तसेच जीव-जिवाणूंच्या योग्य वाढीसाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. जास्त पाणी टाकले तर तापमान कमी होते. या जिवाणूंच्या पोषणासाठी अधूनमधून कुंडीत ताक टाकावे. जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी मटण, मासे धुतलेले पाणी कुंडीत टाकावे. डाळ-तांदूळ धुतलेले पाणीही उत्तम. त्यामुळे जिवाणूंचे चांगले पोषण होते.कुंडी खाली प्लास्टिक प्लेट ठेवणे टाळल्यास कुंडीतुन निघणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे मुळांचे होणारे नुकसान टाळू शकतो.
 आपण समजा फक्त अन्न खाल्ले आणि पाणी प्यालो नाही आपलं काय होईल आपल्याला अन्न पचन होणार नाही पाण्याशिवाय आपण जगु शकत नाही तसेच झाडाचे आहे.म्हणुन झाडाला पाणी आवश्यक आहे.
झाडांना पाणी द्या पण त्यांच्या आवश्यकतेनुसार च द्या.
जसं आपण समजा फक्त अन्न खाल्ले आणि पाणी प्यालो नाही आपलं काय होईल आपल्याला अन्न पचन होणार नाही पाण्याशिवाय आपण जगु शकत नाही तसेच झाडाचे आहे.म्हणुन झाडाला पाणी आवश्यक आहे.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
                              #कुतूहल पाणी देण्याचे
                           # वनस्पती तील बाष्पीभवन
                         #पाणी देणे
                                  संदर्भ -माहिती इंटरनेट
                              चित्र   -इंटरनेट  
   सौ. उज्वला तायडे, अकोट

Comments

  1. फारच छान माहिती आहे

    ReplyDelete
  2. उत्तम माहिती

    ReplyDelete
  3. उपयुक्त माहिती 👌👌👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....