'कुतूहल'वैज्ञानिक दृष्टीकोनाचे...

     
परवा एका विद्यार्थ्याने विचारले,  ते वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय?आज बऱ्याच लोकांच्या status ला बघितले म्हणून विचारले.थोडं घाईत होते म्हणून म्हटले नंतर सांगते.मानवी प्रगतीमध्ये प्रश्न विचारण्याचा आणि त्याची उत्तरे शोधण्याचा खूप मोठा वाटा आहे.मानवी विकासात व मानवी प्रगतीत कशाचा वाटा जास्त आहे हे ठरवायचे झाले तर निरीक्षण करणे, प्रश्न विचारणे, पर्याय शोधणे या बाबींचा वाटा महत्वाचा ठरेल. पूर्वी पडलेले अनेक प्रश्न व समस्या मानव एकट्याच्या जोरावर सोडवत असणार .मात्र आता त्याचे प्रश्न अनेकांच्या मदतीने सुटू लागले .इंटरनेट चा वापर करून एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. त्यामुळे मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करता येते.
त्याने मिळवलेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडले जाते.एका थोर विचारवंताने म्हटले आहे,"श्रध्दा ठेवणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती नसून प्रश्न विचारणे आणि ज्ञान मिळवणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशाळेतील विज्ञानाचे प्रयोग यामध्ये फरक आहे. प्रयोगशाळेमध्ये केले जाणारे प्रयोग हे नक्कीच महत्त्वाचे आहेत. पण त्यामध्ये विज्ञानाचा मूलभूत हेतू आणि विज्ञान ज्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर उभं राहतं, हे लक्षात घेतलं जाईलच असं नाही.

विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकावर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडया कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळया परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन. जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत-पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे, आणि त्यामुळे ते झाकण उडतंय. त्यानं झाकण उचललं, बाहेर येणारी वाफ पाहिली, आणि अनुमान काढलं, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्यानं विचार केला, प्रयोग केले, आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं.
वैज्ञानिक दृष्टिकोन (scientific temper) या संकल्पनेत दोन महत्त्वाचे मुद्दे सामावलेले आहेत - एक म्हणजे, समाजातील सर्वांगीण विकासामध्ये विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित करणं. आणि दुसरं, आधुनिक सामाजिक मूल्यांच्या प्रगतीसाठी विज्ञानाचं महत्त्व ठसवून सांगणं.
विज्ञान म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला न्यूटन ची आठवण येते. आणि मग त्या अनुषंगाने येणारी ती ऐतिहासिक सफरचंदाची गोष्ट!
न्यूटनचे त्या झाडाखाली बसणे,त्याचवेळी सफरचंदाचे खाली पडणे आणि सफरचंद खालीच का पडले?या उत्सुकतेपोटी सुरू झालेली त्याची विचारप्रक्रिया!या घटनेकडे काळजीपूर्वक जर पाहिलं तर एक प्रक्रियांची शृंखला आपल्याला दिसेल.
निरीक्षण-(डोळ्यांनी सफरचंदाचे खाली पडताना पाहणे),पुनः पुन्हा निरीक्षण(इतर वस्तूंचे खाली पडणे),परिकल्पनांची मांडणी(गुरुत्वाकर्षण),त्याचा पडताळा घेण्यासाठी विविध प्रयोग, त्यावर आधारित अनुमाने, अनुमानांवरून भविष्यकथन, सामान्य करन (गुरुत्वाकर्षणाचे नियम),प्रयोगावर करण्यात आलेले मापन, चलांवर नियंत्रण, माहितीचा अन्वयार्थ, निष्कर्ष आणि शेवटी निष्कर्ष सर्वांपर्यंत पोहचविणे.
विज्ञानाच्या संदर्भातील हे टप्पे म्हणजे विज्ञान प्रक्रिया कौशल्ये!
मुळातच विज्ञानामध्ये कुतूहलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच विज्ञानातील गूढ व अनाकलनीय अशा बाबी या प्रक्रियांच्या मार्फत प्रकाशात आणता येतात.
विज्ञान शिक्षण ऐकून व स्मरणाने होत नसते तर त्यासाठी योग्य निरीक्षणे ,वैज्ञानिक कृती, निष्कर्ष काढण्याची क्षमता, तर्कशक्ती या कौशल्यांचा विकास व्हावा लागतो.
कोणत्याही क्षेत्रातील ज्ञानप्राप्तीसाठी कोण?का?कसे?केव्हा?असे प्रश्न विध्यार्थ्यांना असणे, त्यांची उत्तरे शोधणे, हे महत्त्वाचे असते. विज्ञानाच्या अभ्यासात तर हे प्रश्न असणे, त्या दृष्टीने विचार करणे, त्यांची उत्तरे मिळवणे हे लागतेच.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सामान्य जनतेचं जीवनमान उंचावलं जातं, याबद्दल कोणतंही दुमत असायचं कारण नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर, आयुष्यमान वाढवणं अथवा दारिद्र्य आणि हालअपेष्टा कमी करण्यापासून ते आपल्या भौतिक जगाला समजून घेण्यासाठी या विश्वाची उकल करणे आणि त्यायोगे मानवी समाजाच्या अत्युच्च उत्कर्षासाठी विज्ञानानं अनेक संधी आणि मार्ग खुले केले आहेत.
येत्या काळात आपल्यासमोर काही जुनी तर काही नवीन अशी बरीच आव्हानं आहेत. अशावेळी आपण जर जुन्या भाकड, अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांना दूर केलं नाही तर ते समाजातल्या बहुतांश जनतेच्या हिताच्या विरोधाचं ठरेल. त्यामुळे अशा प्रतिगामी विचारांना रोखणं ही आज आपल्या सर्वांची जबाबदारी बनली आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन  असला म्हणजे चौकसपणा आणि तर्कशुद्ध विचारांना चालना  आणि अंधश्रद्धेवर आधारित भाकड विचारांवार मात होईल.
आपल्या संविधानात असं लिहिलंय की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे की त्याने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे.
  माझ्या मते सर्वच गोष्टींबद्दलच स्वतःच 'कुतूहल' सतत जागृत ठेवणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन.त्याच निरीक्षण करून अभ्यास करने म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन.
           
                  #वैज्ञानिक दृष्टीकोन
                  #scientific temper
                  संदर्भ-माहिती इंटरनेट
                  चित्र-इंटरनेट
           
                @ujwala tayade, Akot




Comments

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....