'कुतूहल'ग्रीष्मातील 'बहावा' आणि 'गुलमोहोराचे'...


 करोना vaccine घेण्याच्या निमित्ताने  घराबाहेर
 पडल्याने रस्त्यावरील सुंदर अश्या सोनसळी रंगाच्या, जर्द पिवळ्या रंगाची झकाळी असलेल्या बहावा ,लालबुंद असलेल्या गुलमोहोर, नितांत सुंदर ,मनमोहक अश्या ग्रीष्मातील दोन्हीही झाडांचे दर्शन घडले. गाडीतून झरकन  बहाव्याची झाडे सरकत होती ,मोहच आवरला नाही गाडी थोडीशी थांबवायला लावली आणि घेतले नयनसुख त्या सोनसळी रंगांच्या फुलांचे. गाडीतील AC च्या थंडाव्या पेक्षाही थंडावा जाणवत होता तेव्हा त्या फुलांकडे बघताना.

   वसंत ऋतूला ऋतूंचा राजा म्हणतात. कुसुमाकर असेही त्याचे एक यथार्थ नाव आहे. कारण नवीन पोपटी, चकचकीत, तजेलदार हिरव्यागार पालवीबरोबर अनेकानेका वृक्षवेलींच्या फुलण्याचा, बहरण्याचा हा काळ असतो. आपण लहानपणापासून घोकत आलो आहोत, की ‘चैत्र-वैशाख वसंत ऋतू’ मराठी साहित्यामध्ये सर्वत्र असेच वर्णन केलेले आढळते. अगदी निसर्गप्रेमी  भरभरून फुलायला लागलेल्या बहाव्याचे किंवा गुलमोहराचे सुंदर रंगीत चित्र वृत्तपत्रात देऊन त्याखाली लिहितात, की ‘वसंत ऋतूची चाहूल.’ वास्तविक बहावा आणि गुलमोहर हे ग्रीष्मात फुलणारे वृक्ष आहेत.
गुलमोहर हे जगातील सुंदर झाड म्हणून ओळखले जाते. रणरणत्या उन्हातही फुलणारा हा वृक्ष आहे. हे झाड झटपट वाढते. अंदाजे ३൦ ते ४൦ फूट उंचीपर्यंत हे झाड वाढते. एप्रिल आणि मे महिन्यातच ही फुले बहरतात. गुलमोहरच्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे याची एक पाकळी इतर पाकळ्यांहून वेगळी असते. एक पाकळी रंगाने पिवळी असते आणि त्यावर लाल रेषा असतात. तर इतर पाकळ्या लाल-केसरी रंगाच्या असतात. त्यामुळे ही फुले आणखीन आकर्षक दिसतात. 
कॅसिया फिस्टुला हे बहावाचे शास्त्रीय नाव आहे. या झाडाची उंची ४൦ फुटांपर्यंत असू शकते. बहाव्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात. झाडाला जणू पिवळ्या रंगाचे झुंबर लटकावेत अशी ही फुलं झाडावर बहरलेली असतात. यात फुलांच्या गुच्छांमध्ये कळ्या आणि फुलं असे दोन्ही प्रकार आढळतात. 
या फुलांचा रंग पिवळा असतो. काही ठिकाणी असलेल्या बहावा फुलांचा रंग पांढरा आहे. रात्री बहाव्याच्या फुलांचा मंद सुगंध तुम्हाला मंत्रमुग्ध करतो. खास करून या फुलांचा रंग मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतो. दक्षिण भारतात या फुलांना सोन्याचे म्हणजे वैभवाचे प्रतिक मानतात. भारत सरकारच्या टपाल खात्यानं बहावाच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीट काढले आहे.
तप्त उन्हातील शितलतेचा शिडकावा म्हणजे बहावा.
 बहावा कडे बघून असे वाटते की, हा असा सतत फुलतच रहावा.
 अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे मुख्यत्वेकरुन पुनरुत्पादनाकरिता असलेला रुपांतरीत भाग.
फूल फुलझाडांमधील प्रजननाचा  अवयव आहे. फुलामध्ये  पुंकेसर  व स्त्रीकेसर असतात . कीटकांना
 आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो .फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते.फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, सण, 
 शुुुभ    प्रसंग असला की वेगवेगळी फुले  अर्पण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला   फुलोरा असे म्हणतात.
विज्ञानक्षेत्राबाहेर ‘फूल’ याचा अर्थ कोणत्याही बाबीतील अत्युत्तम भाग किंवा बाजू असा केला जातो, कारण सामान्य लोकांना फूल हे वनस्पतींच्या जीवनसाफल्याचे, उत्कर्षाचे व वैभवाचे द्योतक वाटते त्यांच्या मते तो वनस्पतींचा अलंकार व उपमेय भाग आहे. वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने फूल ही संज्ञा बीजे निर्माण करणाऱ्या इंद्रियास सर्वसाधारणपणे लावली जाते सर्व बीजोत्पादक वनस्पतींना बीजी वनस्पती म्हणतात.
खरं तर ऋतू हे पृथ्वी आणि सूर्य यांच्या परस्पर संबंधांवर आधारित आहेत आणि आपले मराठी महिने हे चांद्रमास आहेत. त्यामुळे आपल्याकडे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल वसंत ऋतू आणि १६ एप्रिल ते १५ जून ग्रीष्म ऋतू हेच योग्य आहे. त्या दृष्टीने आपला वसंत केव्हाच संपलाय! आता ग्रीष्म सुरू आहे.
सुरुवातीला उल्लेख केलेले बहावा आणि गुलमोहर हे तर उन्हाळ्यात फुलणारे, अगदी वेड लावणारे वृक्षराजच आहेत. एरवी ध्यानातही न येणारा बहावा भरभरून बहरला, की पहातच रहावेसे वाटते!
उद्यानात, रस्त्याकडेने, बंगल्यांच्या आवारातच नव्हे; तर टेकड्यांवर, सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर सर्वत्र आढळणारा हा अस्सल भारतीय वृक्ष आहे. अगदी आद्य ग्रंथ ऋग्वेदातही त्याला ‘राजवृक्ष’ म्हणून गौरवलंय! सोन्याच्या दागिन्यांनी नखशिखान्त नटलेला, अंगाखांद्यावरून सोनपिवळ्या पुष्पमाला दागिन्यांसारख्या मिरवणाऱ्या बहाव्याला राजाची उपमा यथायोग्यच वाटते. बहुतेक ठिकाणी हा वृक्ष लहानसाच असतो.
बहाव्याचे लाकूडही छान असते आणि शेंगा औषधी असतात.
गुलमोहराची नजाकत काही औरच असते. उन्हाळ्यात त्याची सुंदर हिरवीपोपटी नाजूक पालवी नयनमोहर दिसते. लाल, किरमिजी किंवा नारिंगी रंगाच्या अतिसुंदर फुलोऱ्यांनी पानांशी साधलेली विरोधी रंगसंगती डोळयाचे पारणे फेडणारी असते. तलवारीच्या आकाराच्या काही शेंगाही झाडावर दिसतात. गुलमोहराचे हे रंगात येणे फक्त उद्यानात, रस्त्याकडेने आणि मानवी वस्तीच्या आसपासच पहायला मिळते. जंगलात गुलमोहर नसतात. कारण तो मूळचा मादागास्कर-पूर्व आफ्रिकेमधला वृक्ष आहे. भारतीय वृक्ष नाही. 
उन्हाळ्यात पुष्पसौंदर्याची रंगपंचमी साजरे करणारे परदेशी वृक्ष म्हणजे पांढरा चाफा, पिवळ्या फुलांचा पेल्टोफोरम, नारिंगी पुष्पवैभव मिरवणारा सिल्व्हर ओक, लाल गुलमोहर आणि निळा जांभळा जॅकरांडा हा मूळचा दक्षिण अमेरिकेतला सुंदर वृक्ष असून, काहींनी त्याचे ‘नीलमोहर’ असं नामकरण केलंय. गुलमोहराच्या मानाने दुर्मिळ. वसंत ऋतूतच फुलायला सुरुवात करून ग्रीष्मातही फुलत राहणारा. नवीन पालवीबरोबर जॅकारांडा बहरू लागतो आणि पाहता पाहता झाड निळ्या-जांभळ्या, नाजूक, मुलायम फुलांच्या तुऱ्यांनी डोलू लागते. फुलांचा रंग अतिशय तजेलदार, ताजा आणि उत्साहवर्धक!
 गुलमोहोर हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.
अशा सुंदर गुलमोहराचा छोटा अवगुण म्हणाल तर गुलमोहराची मुळे,गुलमोहराची मुळे गुलमोहराचे झाड जसे वाढत जाते तशी मोठी होत जातात.आधार मुळांसारखी जमिनीच्या नजीक गुलमोहराचा बुंधा उंचावतो व पसरट आधार मूळं जमिनीतून डोके वर काढतात.कधीकधी ही गुलमोहराची मुळे इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू शकतात.गुलमोहराच्या जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगिच्यांत बांधलेले रस्ते  किंवा दगडी पायवाटा गुलमोहर पार उखडून टाकू शकतो.पण इतक्या चांगल्या झाडाच्या या छोट्या दोषाकडे थोडा कानाडोळा करून जर गुलमोहर रस्ते इमारतींपासून थोडा दूर ठेवला तर या वृक्षासारखा सौंदर्यसंपन्न दुसरा वृक्ष नाही. अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहराच्या पिळदार खोडांचे वृक्ष उभे आहेत.
 हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.
बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो.हिंदीत त्याला अमलताश म्हणतात.
खरोखरच ग्रीष्मातील फुलांचे सौन्दर्य आणि कुतूहल काही औरच असतं.
         
                 #   कुतूहल  ग्रीष्मातील फुलांचे
            #गुलमोहोर#बहावा#जॅकरांडा
                       
                संदर्भ-माहिती इंटरनेट, चित्र- इंटरनेट
                             @ujwala tayade, Akot
          

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हरित श्वासांचा सोहळा........

कुतूहल साडीचे......

कुतूहल.......रात्री उमलणाऱ्या पांढऱ्या रंगांच्या सुगंधी फुलांचे....