'कुतूहल',Flame of forest...पळसाच्या सौन्दर्याचे....
दररोज रस्त्याने जाताना अजूनही शिशिरातील थंडीचा गारवा बोचत असताना ,रस्त्याच्या दुतर्फा अचानक लालबुंद, नारिंगी पळस डोकं वर काढून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होता.तेव्हा जाणवत होते की इंग्रजांनी पळसाला flame of forest ही उपमा का दिली असावी. कारण तो फुलल्यानंतर विस्तवाच्या गोळ्याप्रमाणे दिसतो.वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेते.आपल्या अलौकिक सौन्दर्याचे मुक्तपणे प्रदर्शन करताना पळस रखरखत्या उन्हात जरासुद्धा घाबरून जात नाही.
शिशिराची थंडी ओसरायला लागली की ,सृष्टीने पांघरलेली हिरवीगार शाल हळूहळू आपला रंग बदलायला लागते ,पिवळसर होत जाते.बऱ्याच झाडांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटू लागते, आणि अशातच मग हा तपस्वी/योगी आजूबाजूला कुठेही favourable वातावरण नसताना देखील माळरानावर, रस्त्याच्या दुतर्फा रुक्ष, ओसाड जागेवर दिमाखात फुलताना ,अगदीच डोकं वर काढून मिरवताना दिसतो.
मी पळसाला योगी/तपस्वी याच साठी संबोधले होते कधीच कोणतीही कुरबूर न करता शांतपणे रखरखत्या उन्हात देखील एखाद्या तपसव्या प्रमाणे समाधी लावून असतो.मला तर गेल्या 15 वर्षांपासून दरवर्षी ह्या पळसाच्या सौन्दर्याचा आनंद अनुभवायला मिळतो, रस्त्याच्या बाजूला ज्या बाजूने शेत जमिनी नाहीत, अश्या पडीक जागेत 9km च्या अंतरात तब्बल 67 पळसाच्या झाडाला फ़ुलं असे पर्यंत अगदीच रमणीय असं वाटतं. कधी कधी तर फुलांच्या तीव्र रंगामुळे आपली गाडी जर वेगात असेल तर आग लागल्याचा भास होतो.म्हणून पळसाच्या फुलांकडे बघून आपसूकच गाडीचा speed कधी कमी होतो हे देखील कळत नाही.कधी कधी तर स्वतःची थोडीशी लाज वाटल्या सारखे होते. हातात हॅन्डग्लोव्हज, डोक्यात हेल्मेट/scarf, वरून suncoat/overcoat, उन्हापासून संरक्षण असणारे हलक्या रंगाचे सुती कपडे घालून आपण आणि हा पळस अगदीच एवढ्या उन्हात उघडा नागडा ,सूर्याशी टक्कर देतो .पळसाची एक खासियत म्हणजे जेव्हा पळसला भरपूर प्रमाणात पाने असतात तेव्हा फुले नसतात आणि जेव्हा भरपूर फुले असतात तेव्हा तो निष्पर्ण असतो.त्यामुळे लाल तांबड्या फुलांचे घुमारे फुलतात सगळीकडे .संस्कृत मध्ये पळसला पलाश म्हणतात.पलाश म्हणजे फुलांनी बहरलेले झाड.कालिदासांनी तर पळसला 'ऋतुसंहार'हे नाव दिले आहे.आमच्या विदर्भात तर पळस वरदान च आहे.
रखरखीत भूमीवर पळस हिरवाई आणतो.पडीक जमीन, डोंगराळ भाग, कधी कधी तर टेकडीवर सुद्धा फुलतो.
उघड्या बोडक्या झालेल्या शेताला, रानाला केसरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला सर्वत्र आढळतो.
वनविभागाने सोडला तर इतर ठिकाणी पळस आपसूकच उगवलेला दिसतो.
पळसाची उंची फारशी नसते, पानगळी वृक्ष आहे पळस.
पळसाचे खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात तर त्याची साल ही खडबडीत राखाडी रंगाची असते .पाने आकाराने मोठी आणि गोलाकार असतात.
प्रत्येक देठावर तीनच पाने असतात .
'पळसाला पाने तीनच' ही म्हण फार पूर्वीपासून वापरली जाते.यातही गहन अर्थ दडलेला आहे बरं.
असंग्रह आणि संयमाची उक्ती देणारी सूचना आहे त्यात.
कितीही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणात च करू शकता, limitations मर्यादा सांगणारी आहे ह्या पानांची म्हण.संस्कृत मध्ये ह्याच्या तीन पानांमुळे त्याला 'त्रिपिटक' म्हणतात.
कोंकणांत पाऊस जास्त पडतो तेव्हां चवथें पान फुटेल म्हणून पळस कोंकणांत गेला तेथेंहि तीन पानेंच फुटलीं. यावरुन कोठें गेलें तरी कर्मदशा बरोबर असती ती सोडीत नाहीं असा अर्थ.असे देखील म्हणतात.
पळसला मात्र एक वाक्य सादगी मे सुंदरता है हे
तंतोतंत लागू पडते, कारण पळसला ना शहरातील जगमगाट हवा ना इमारतींच्या जंगलांची आवड.
पळसला ब्युटीया मोनोस्परमा म्हणतात.पांढऱ्या पळसला ब्युटीया पार्रवाफ्लोरा म्हणतात.पळसाच्या फुलांचा उपयोग अबीर गुलाल बनवण्यासाठी करतात.तुरटी, चुना किंवा क्षार मिसळून पक्का नारिंगी रंग तयार करतात.पळसाच्या वाळलेल्या फुलांचे सरबत उष्णताशामक आहे.आपलेकडे केशर नसेल तर option म्हणून वाळलेल्या फुलांचा खाद्यरंग म्हणून वापर करू शकतो.पळस वैद्यराज म्हणून देखील काम करतो,उष्णता रोधक ,वातवर्धक,मलरोधक, पित्तशामक,रुधिरविकार व कुष्ठनाशक .पानांपासून पत्रावळी, द्रोण देखील तयार करतात.पळसाचे पाने, फुले, डिंक,मुळे, बिया सर्वच उपयोगी आहे.
.खरोखरच खूप कुतूहल वाटते ह्या पळसाच्या सौन्दर्याचे.
त्याच्याच सोबतीला असलेले पिवळा बहावा, तांबडा गुलमोहर,पांढरा चाफा, पांढरा पांगारा,केशरी पांगारा, लालचुटूक काटेसा वर पिवळा हादगा, हळूहळू सर्वच झाडे एकयक पाऊल पुढे टाकत अगदी मुक्तपणे बहरून येतात.पळस मात्र होळीच्या थोडा अगोदरच येतो. या सर्व फुलांमध्ये मात्र पळस आपलं असं वेगळं अस्तित्व दाखवतो.माझेकडे तर दरवर्षी होळीला ह्या पळस फुलांच्या रंगाचीच ecofriendly होळी साजरी केली जाते,शिवाय माझ्या मुलीला तर पळसाच्या फुलांचा flowerpot जास्त आवडतो.इतकी आवडतात पळस फुले की त्यांना रांगोळीत उतरवण्याचा मोह आवरता येत नाही.
वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचेच लक्ष वेधून घेते.पळस फुलांकडे बघितल्यावर असे वाटते की एखादी नवतरुणी गर्द हिरव्या, काळ्या रंगाच्या velvet च्या साडीवर गर्द केशरी रंगाचे blouse घालून भर उन्हात रस्त्याच्या कडेने उभी आहे. पळसला जसा आकार नाही तसाच त्याच्या सुंदर, मनमोहक रंगाला गंधही नाही.परंतु फुललेला पळस सर्वांना आवडतो.पळस फुलला की संपूर्ण जंगल, माळरानावर लाल रंगाची उधळण होते.
पळस मैनेसह अनेक पक्षी पळसाच्या फुलातील मध वेचण्याकरता झाडावर येतात.
जिथे पळस असतो तिथे पाण्याची कमतरता असते.अश्या ठिकाणी जिथे कोणतेही झाड टिकत नाही तिथे पळस टिकतो, वाढतो,बहरतो आणि मानवावर अनंत उपकार करतो.पळस तसा दुर्लक्षित आहे पण परोपकार करण्याचे काम तो तत्परतेने,निरंतर, आणि निरपेक्षपणे करतो.
आहे न 'कुतूहल'पळसाच्या सौन्दर्याचे.....
#कुतूहल पळसाच्या सौन्दर्याचे
#पळस
#flame of forest
संदर्भ-मराठी विकिपीडिया
इंटरनेट
@सौ. उज्वला तायडे, अकोट
कुतूहल परत आलं, छान md
ReplyDeleteKhupch sundar
ReplyDeleteखरंच पळस म्हणजे भगवे वस्त्र धारण केलेला तपस्वी च. . खूप छान लिहिलं.. मला पण पळस खूप आवडतो..
ReplyDeleteखूप खूप छान....
ReplyDeleteपलाश वृक्ष सुरेख लिहिलंय
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअतिशय छान
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन सुरेख आहे लेख आणि छायाचित्रे पण
ReplyDelete